सातारा - जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज (गुरुवारी) जिल्ह्यातील तब्बल 21 जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 113वर पोहोचली आहे.
साताऱ्यात एका दिवसात 21 कोरोनाग्रस्तांची नोंद; एकूण रूग्णसंख्या 113वर - साताऱ्यात एका दिवसात 21 कोरोनाग्रस्तांची नोंद
सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांत होणारी वाढ ही चिंता वाढवणारी आहे. आज (गुरुवारी) जिल्ह्यातील तब्बल 21 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.
सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाबाधित रूग्णांमुळे जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे. कराड तालुक्यातील कोरोधाबाधितांची एकूण संख्या ही 86 वर पोहोचली आहे. त्यामुळे कराड तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम ठेवले आहेत. सातारा शहरात 6 आणि कराड तालुक्यातील 15 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. कराडमधील मंगळवार पेठ, मलकापूरमधील आगाशिवनगर तसेच तांबवे, गमेवाडी, गोटे, उंब्रज वनवासमाची या गावांमधील रूग्णांचा त्यामध्ये समावेश आहे.
मलकापूर-आगाशिवनगर येथील 2 वर्षीय चिमुकलीसह एका ज्येष्ठाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल सकाळी आला. त्यानंतर दुपारी 13 जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयाच्या वाहनावरील चालकाचाही समावेश आहे.