सातारा - मोकाट श्वानांनी केलेल्या हल्ल्यात तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. राजवीर राहूल होवाळ, (रा. जगताप वस्ती, वाखाणभाग कराड), असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेने कराडकर हादरून गेले आहेत. नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ( Little Boy Killed in Dog Attack )
भटक्या श्वानांच्या कळपाचा हल्ला -मृत मुलाचे कुटूंंबीय जगताप वस्ती नावाच्या परिसरात राहते. सोमवारी दुपारी राजवीर याची आई शेतात काम करत होती. त्यावेळी राजवीर हा घरापासून काही अंतरावर खेळत होता. यावेळी बारा ते पंधरा मोकाट कुुत्र्यांनी राजवीरवर हल्ला चढवला. त्याला फरपटत शेतात नेले. मोकाट कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले. क्रूरपणे कुत्र्यांनी हल्ला करून राजवीरचा बळी घेतला.
शोध घेतल्यानंतर घटना उघडकीस -आई शेतात काम करत असताना राजवीर घराच्या परिसरात खेळत होता. मात्र, घरी आल्यानंतर आईला राजवीर दिसला नाही. त्यामुळे शोधाशोध सुरू झाली. घराजवळच्या शेतात राजवीरचा मृतदेह आढळला. त्याच्या शरीराचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले होते. त्या विचित्र अवस्थेतील मृतदेह पाहून त्याच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि नगरपालिका प्रशासन घटनास्थळी धावले.