कराड (सातारा) - पाटण तालुक्यात कोयना नदीवरील सांगवड पुलाजवळ दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात होऊन तीघे जण ठार, तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता. बबन धोंडीराम पडवळ, भरत रामचंद्र पाटील आणि नितीन बबन तिकुडवे, अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
मृत व जखमी पाटण तालुक्यातील -येरफळे (ता. पाटण) येथील बबन धोंडीराम पडवळ (वय 65), भरत रामचंद्र पाटील (वय 40) यांच्यासह अन्य एक असे तिघे जण सेंटरिंगचे काम संपवून मोटरसायकलवरून घरी निघाले होते. त्यांच्या मोटरसायकलची कोयना नदीवरील सांगवड पुलाजवळ समोरून भरधाव वेगात आलेल्या मोटरसायकशी समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात समोरच्या मोटरसायकलवरील नितीन बबन तिकुडवे (वय 36, रा. शिंदेवाडी, ता पाटण) हा तरुण जागीच ठार झाला, तर भरत पाटील, बबन पडवळ, संकेत शिंदे आणि अनिकेत पाटील हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना कराडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान बबन पडवळ आणि भरत पाटील यांचा मृत्यू झाला. अन्य दोघांवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.