कराड (सातारा) -सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचे त्रिशतक पुर्ण केले आहे. आतापर्यंत 310 रूग्ण कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झाले आहेत.
कराड आणि पाटण तालुक्यातील कोरोनामुक्त झालेल्या 16 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्या बरोबरच कृष्णा हॉस्पिटलचे कोरोनामुक्तीचे त्रिशतकही पुर्ण झाले.
कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांना कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे, कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्रभारी कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, डॉ. रजनी गावकर, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. एस आर. पाटील, डॉ. नम्रता कदम, योगेश कुलकर्णी या मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार 22 कोरोनाबाधित रुग्ण वाढले. यामुळे रुग्णसंख्या 1865 वर पोहोचली होती. दिवसभरात 42 जण कोरोनामुक्त झाल्या मुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 1108 वर पोहोचली. सध्या 690 रुग्णांमवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून मृतांची संख्या 67 वर पोहोचली आहे.