सातारा(कराड) -तळबीड गावातील तीन कोरोनाबाधित महिलांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तळबीड गावातील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 19 वर पोहचली असून आरोग्य विभागाने निम्मे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर केले आहे. तळबीड हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे गाव आहे.
कराड तालुक्यातील तळबीडमध्ये एकाच दिवशी कोरोनाचे तीन बळी - तळबीड कोरोना अपडेट
गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. कराड तालुक्यातील तळबीड गावामध्ये एकाच दिवशी तीन महिलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
तळबीड गावात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या गावातील तीन महिलांचा कोरोनाने एकाच दिवशी मृत्यू झाला. त्यामुळे तळबीड, उंब्रज परिसरात खळबळ उडाली आहे. तळबीड गावात सध्या कोरोनाचे 19 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणेने गावात कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना सुरू केल्या आहेत. कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी कोरोनाबाधित रूग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधित जाहीर केला आहे. तसेच संबंधित परिसरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेशही दिले आहेत. गतवर्षी तळबीड गाव कोरोनाच्या संक्रमणापासून वाचले होते. परंतु, दुसर्या लाटेत तळबीड गावात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 19 झाली आहे. त्यातच तीन बाधित महिलांचा मृत्यू झाल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तळबीड गावातील तीन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू झाला असल्याची माहिती उंब्रज येथील आरोग्य केंद्राच्या सुत्रांनी दिली आहे.