सातारा- तळबीड (ता. कराड) येथील औद्योगिक वसाहतीत एका व्यक्तीकडून देशी बनावटीची दोन रिव्हॉल्व्हर आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत १ लाख १० हजार रुपये इतकी आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
तळबीड औद्योगिक वसाहतीमधील हॉटेल अजिंठा रिसॉर्टमध्ये एक व्यक्ती दोन रिव्हॉल्व्हरसह येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार सर्जेराव पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड व त्यांच्या पथकाला कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेल अजिंठा रिसॉर्ट बाहेर सापळा लावला होता. हॉटेलच्या डायनिंग हॉलमधील एका व्यक्तीवर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याची अंगझडती घेतली. यात त्याच्याकडे १ लाख १० हजार रुपये किंमतीची दोन रिव्हॉल्व्हर आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आलीत.