सातारा -युवकालाकोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेचे वारस म्हणुन अमिष दाखवत साडेतीन लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मालमत्तेचा वारस होण्याचे आमिष-
शिरवळच्या पशूवैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या सुयश विजय गुंड या विद्यार्थ्याला भामट्यांनी हा गंडा घातला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवळ (ता.खंडाळा) येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयात सुयश गुंड हा युवक शिकत आहे. १७ डिसेंबर २०२० रोजी सुयश गुंड याच्या मोबाईलवर एक संदेश आला. मॅरियम ऍडम हे मृत्यू शय्येवर आहेत. त्यांना भारतामधील अनाथ मुलांकरिता मालमत्ता दान करायची असून त्याकरिता आपण ही प्रक्रिया राबविण्यास तयार आहात का? अशी विचारणा करण्यात आली. तयारी असल्यास एका ई-मेल आयडीवर संपर्क व वैयक्तिक माहिती पाठविण्यास सांगण्यात आले.
अमिषाला पडला बळी-
सुयशने त्यानुसार ही माहिती पाठविली असता विविध इमेलद्वारे व फोनद्वारे संपर्क साधण्यास सांगण्यात आले. सुयश गुंड याला कोट्यावधी रुपयांचा वारसदार म्हणून नाव लावण्यासाठी विविध प्रकारे, कारणे देत रक्कम भरण्यास सांगितले गेले. सुयशने आपल्याकडील व मित्रांकडून पैसे उसने घेऊन संबंधितांनी दिलेल्या विविध खात्यांमध्ये भरले. आत्तापर्यंत तब्बल ३ लाख ५४ हजार ५०० रुपये जमा केले.