सातारा : राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना ईमेल द्वारे धमकी देण्यात (Prithviraj Chavan Threat Email) आली आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद झाली आहे. दरम्यान, धमकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
संभाजी भिडेंना तात्काळ अटक करा : राष्ट्रपित्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माणूस बाहेर कसा फिरू शकतो?, असा सवाल करताना पृथ्वीराज चव्हाण संतप्त झाले होते. संभाजी भिडे या व्यक्तिला ताबडतोब अटक करा, अशी मागणी चव्हाण यांनी सभागृहात केली होती. चव्हाण यांच्या मागणीला काँग्रेसच्या इतर आमदारांनी पाठिंबा दिला.
काँग्रेस आक्रमक : भिडे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस सदस्य आक्रमक झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मागणीची दखल घेतली. तसेच माहिती घेऊन या प्रकरणी उचित कारवाई केली जाईल, असे नार्वेकर यांनी आश्वासित केले होते. मोहनदास यांचे खरे वडील करमचंद गांधी नसून मुस्लिम जमीनदार असल्याचे धक्कादायक विधान संभाजी भिंडे यांनी केले होते. त्यांच्या या खळबळजनक वक्तव्याची दखल घेत काँग्रेस पक्ष आक्रमक झाला होता. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेच. तसेच पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. काँग्रेसने दिलेल्या तक्रारीच्या आधारे अमरावतीमधील राजापेठ पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसने केली तक्रार : संभाजी भिडे यांनी गुरुवारी सायंकाळी शहरातील बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती. भिंडे यांनी महात्मा गांधी यांचे वडील करमचंद गांधी यांच्या चारित्र्यावर आक्षेप घेतला होता.