सातारा- कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांना कॅनिबेट मंत्रीपद देण्यात आले आहे. सोमवारी (दि. 30 डिसें.) त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच कराडमधील मंगळवार पेठ, दत्त चौक आणि मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला. माजी क्रीडा मंत्री शामराव आष्टेकर यांच्यानंतर तब्बल 30 वर्षानंतर कराड उत्तरला मंत्रीपद मिळाले आहे. बाळासाहेब पाटील हे कराड उत्तरमधून सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत. त्यांना सहकार खाते मिळेल आणि सातार्याचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडेच दिले जाईल, असे संकेत मिळत आहेत.
आमदार पाटील हे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवार पेठ, दत्त चौकात डिजीटल स्क्रीनची सोय केली. त्यामुळे नागरिकांना शपथविधी सोहळ्याचे थेट प्रेक्षपण पाहता आले. त्यांनी शपथ घेताच कराडसह मतदार संघात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
आमदार बाळासाहेब पाटील हे 1992 सालापासून राजकारणात सक्रिय आहेत. सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक म्हणून सहकार क्षेत्रातील त्यांची कारकीर्द सुरू झाली. 1996 साली कारखान्याच्या चेअरमनपदी त्यांची निवड झाली. 1999 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीतून कराड उत्तरचे आमदार झाले. 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग पाचवेळा ते निवडून आले. 2009 चा (अपक्ष) अपवाद वगळता चार वेळा ते घड्याळ चिन्हावर निवडणूक लढले आणि विजयी झाले. तसेच 1999 पासून आजपर्यंत ते राष्ट्रवादीशी एकनिष्ठ आहेत.