सातारा - मावळत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी वासोटा, कास, भांबवली परिसरात जाण्याचे नियोजन करत असाल तर जरा थांबा. कारण ही निसर्ग पर्यटनस्थळे ३०-३१ डिसेंबर व १ जानेवारी या तिन्ही दिवशी बंद असणार आहेत.
येथे असणार मज्जाव
निसर्गात जाऊन उपद्रवी हस्तक्षेप रोखण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वासोटा किल्ल्यासह कास पठार, कास तलाव परिसर व भांबवलीचा वजराई धबधबा परिसरात पर्यटकांना प्रवेश व थांबण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
३०, ३१ व १ रोजी बंद
वन्यजीव विभागाचे बामणोली येथील वनक्षेत्रपाल बी. डी. हसबनीस यांनी सांगितले. वासोटा किल्ला येथे मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स येत आहेत. विशेषतः सलग सुट्ट्यांच्या कालावधीत येथे ट्रेकर्सची गर्दी होऊ लागली आहे. जंगल भ्रमंतीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रिघ वासोट्याला लागलेली असते. नववर्षानिमित्त आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांपासून वन्यजीवांना उपद्रव होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी येत्या ३०, ३१ डिसेंबर आणि एक जानेवारी या तिन्ही दिवशी वासोटा किल्ला पर्यटनासाठी बंद राहणार आहे.
कारवाईचा इशारा
जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळालेले कास पठार व भांबवली परिसरातही पर्यटकांच्या हालचालींना या तीन दिवसांसाठी प्रतिबंध राहणार असल्याचे साताऱ्याच्या वनक्षेत्रपाल शीतल राठोड यांनी सांगितले. या काळात पठारावर तसेच भांबवली, तांबी परिसरात रात्रगस्त राहणार असून वनकायद्याचे उल्लंघन करणारांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही श्रीमती राठोड यांनी दिला आहे.