महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फलटण तालुक्यात विहिरींना लागले पेट्रोल; मासे, बेडूक, सापांचा मृत्यू - सासवड पेट्रोल चोरी

मुंबई-पुणे-सोलापूरला जाणार्‍या पेट्रोल-डिझेल पाईपलाईनमधून पेट्रोल चोरीचा प्रयत्न करताना पाईपलाईन फुटल्याने फलटण तालुक्यातील झणझणे सासवड परिसरातील शेतं आणि विहिरी पेट्रोलने भरून गेल्या आहेत. पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी चक्क पेट्रोल वाहून नेहणारी उच्चदाबाची जमिनीखालील पाईपलाईन फोडली आहे. याबाबत कंपनीकडून लोणंद पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा
सातारा

By

Published : Mar 3, 2021, 8:21 AM IST

Updated : Mar 3, 2021, 12:18 PM IST

सातारा - गेल्या काही दिवसांपासून इंधन दरांनी उच्चांक गाठला आहे. या पार्श्वभूमीवर चोरट्यांनी चक्क पेट्रोलचीच चोरी केल्याचे समोर आले आहे. मुंबई-पुणे-सोलापूरला जाणार्‍या पेट्रोल-डिझेल पाईपलाईनमधून पेट्रोल चोरीचा प्रयत्न करताना पाईपलाईन फुटल्याने फलटण तालुक्यातील झणझणे सासवड परिसरातील शेतं आणि विहिरी पेट्रोलने भरून गेल्या आहेत. याबाबत कंपनीकडून लोणंद पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील झणझणे सासवड (ता. फलटण) गावापासून दोन कि.मी अंतरावर खडकमाळ नावाच्या शिवारात हा प्रकार घडला आहे.

फलटण तालुक्यात पेट्रोल चोरी...

चक्क पेट्रोलचे झरे -

फलटण तालुक्यातील ज्या भागांमध्ये पाणी मिळणे ही एकेकाळी मुश्कील होते. त्या ठिकाणी पेट्रोल वाहू लागल्याने व विहिरीत पेट्रोलचा थर निर्माण झाल्याने चक्क पेट्रोलचे झरे तयार झालेले पहायला मिळाले. पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी चक्क पेट्रोल वाहून नेहणारी उच्चदाबाची जमिनीखालील पाईपलाईन फोडली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर या सुमारे 223 किलोमीटरच्या पाईपलाईनला चोरट्यांनी सासवड गावाजवळ मोठे भगदाड पाडले.

मासे, बेडूक, सापांचे बळी -

पाईपलाईन फोडल्यामुळे दोन हजार लिटर पेट्रोल वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हजारो लिटर पेट्रोल जमिनीत गेल्यामुळे या भागातील विहिरी पेट्रोलने भरल्या आहेत. जमिनीत मुरलेल्या पेट्रोलमुळे अनेक एकर शेतातील उभ्या पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. पेट्रोलच्या वासाने विहिरीतील मासे, बेडूक आदी मृत झाले. तर परिसरातील सापही मृत झाल्याचे दिसून आले. संबधित कंपनीचे अधिकारी, लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी घटनास्थळास भेट दिली. त्यावेळी चोरट्यांनी नियोजनबद्धरित्या पाईपलाईन फोडल्याचे निदर्शनास आले. शेतातील ऊसाच्या सर्‍या, ज्वारीचे वाफे यामध्ये लाखो लिटर पेट्रोल साठून राहिल्याने ज्वारी, मका, ऊस, गवत करपून गेले आहे. संबधीत कंपनीने टँकरद्वारे पेट्रोल भरून नेण्यात सुरूवात केली आहे.

पेट्रोलची दुर्गधी -

घटनास्थळापासून 1 किलो मीटर परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी येण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला असून घटनास्थळी अग्नीशमन दलाची गाडी उभी करण्यात आली आहे. एका विहिरीतून पाणी मिश्रीत पेट्रोल टँकर भरण्याचे काम सुरू आहे. विहिरीत चार इंच पेट्रोलचा थर आल्याने परिसरात पाणी दुषित झाले आहे. त्यामुळे शेतकरी व जनावरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

तीन दिवसांपासून सुरु -

संबंधित कंपनीने पेट्रोल पाईपलाईन तातडीने बंद केली. परंतु, पाईपलाईनमधून पेट्रोलची तीन दिवस गळती सुरू होती. हे पेट्रोल कंपनीने टँकरव्दारे भरून नेण्याचे काम दोन दिवसांपासून सुरु आहे. विहीरीत उतरलेले पेट्रोल टँकरमध्ये भरण्याचे काम आजही सुरू आहे. हजारो लिटर पेट्रोल वाया गेल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Last Updated : Mar 3, 2021, 12:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details