महाराष्ट्र

maharashtra

'सरपंच झालं की मृत्यू होतो'! 'तिने' दिली अंधश्रद्धेला मूठमाती

आपल्याकडे आजही काही श्रद्धा-अंधश्रद्धा मानल्या जातात. अनेकांचा त्यावर विश्वासही बसतो. सातारा जिल्ह्यातील एका गावाच्या सरपंच पदाबाबत एक अंधश्रद्धा परसली होती. मात्र, एका महिलेने त्या अंधश्रद्धेला मूठमाती दिली आहे.

By

Published : Feb 26, 2021, 8:19 AM IST

Published : Feb 26, 2021, 8:19 AM IST

Rajpuri village women sarpanch
राजपुरी गाव महिला सरपंच

सातारा : गाव-खेड्यांमध्ये आजही काही प्रमाणात अंधश्रद्धा पाळल्या जातात. अंधश्रद्धांबाबात विविध अफवाही पसरवल्या जातात. महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी गावातबाबतही अशीच एक अफवा पसरली आहे. या गावात सरपंच झालं की त्या व्यक्तीचा मृत्यू होतो, अशी अफवा कोणीतरी परसवली. मात्र, एका महिलेले गावचे सरपंचपद स्वीकारून या अफवेला मूठमाती दिली. याबाबत 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट..

राजपुरी गावाच्या महिला सरपंच शितल राजपुरे यांनी गावातील अंधश्रद्धा दूर केली

अन् गावात अफवा पसरली -

महाबळेश्वर तालुक्यात पाचगणीपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर, डोंगरउतारावर वसलेले राजपुरी हे गाव आहे. स्ट्रॉबेरीच्या उत्पादनामुळे गाव ब-यापैकी सुधारलेले आहे. गावाचा डामडौल पूर्वीसारखा कायम आहे. या गावचे सरपंचपद स्वीकारणाऱ्याचा मृत्यू होतो, काही घटनांच्या आधारे अशी अफवा गावात आणि गावाबाहेर पसरली गेली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला हवा मिळाली. मात्र, शितल विश्वास राजपुरे यांनी या सर्व प्रकाराला न घाबरता सरपंचपद स्वीकारले आणि गावाच्या विकासासाठी कंबर कसली.

२० वर्ष होते सरपंचपद रिक्त -

'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने राजपुरी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी या अंधश्रद्धेमागील गोष्टींचा उलगडा झाला. सरपंच म्हणून काम केलेल्या व्यक्तींचा यापूर्वी मृत्यू झाला आहे. यातील एकाचा सरपंचपदावर असतानाच मृत्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या ४ टर्म सरपंचपद रिक्त होते. तत्कालीन उपसरपंच हेच गावाचा कारभार पाहत. या सर्व घडामोडींमुळे राजपुरी गावाबाबत अफवा पसरली. मात्र, यावेळी झालेल्या निवडणुकीनंतर महिला आरक्षणामुळे शितल राजपुरे यांना सरपंच होण्याची संधी मिळाली. त्यांनी लोकांच्या मनातील गैरसमज काढण्यासाठी सरपंचपद स्वीकारले.

'त्या' घटनेचा संबंध नाही -

ग्रामपंचायतीच्या ४ पंचवार्षीक निवडणुकांमध्ये सरपंच पदासाठी आरक्षणानुसार पात्र उमेदवार सदस्यांमध्ये नव्हता. त्यामुळेच सरपंचपद रिक्त राहिल्याचे राजपुरीचे माजी उपसरपंच व विद्यमान पोलीस पाटील अजय शंकर राजपुरे यांनी सांगितले. ज्यांचा मृत्यू झाला तो वार्धक्य अथवा आजारपणामुळे झाला आहे. मृत्यूच्या दुर्दैवी घटनेचा आणि सरपंचपदाचा काहीही संबंध नाही. या केवळ वावड्या उठवल्या गेल्या आहेत, असेही राजपुरे यांनी स्पष्ट केले.

'ती' निव्वळ अफवाच -

"मी आस्तिक आहे. मात्र, सरपंचपद स्वीकारल्यानंतर काही वाईट घडते, हे मला मान्य नाही. माझ्या कुटुंबातही कोणी असल्या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही. त्यामुळे सरपंचपदाची संधी मिळाली त्यावेळी मी ती स्वीकारली. आजही मी मोकळेपणाने काम करत आहे." असे गावच्या अपप्रचाराबाबत बोलताना सरपंच शितल राजपुरे यांनी सांगितले.

रिकामटेकड्यांनी उठवल्या वावड्या -

योगायोगामुळे काही गोष्टी घडल्या. त्यामुळे कोणी गैरसमजातून किंवा मुद्दाम ही अफवा पसरवली असावी. प्रत्यक्षात असे काहीही नसल्याचे ग्रामस्थ गंगाधर राजपुरे यांनी सांगितले. तर, पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू आणि सलग सरपंचपद रिक्त राहणे या दोन गोष्टींचा कोणी रिकामटेकड्याने विनाकारण संबंध जोडून वावड्या उठवल्या. त्यामुळे ही अफवा माध्यमांपर्यंत पोहचली, असे बाळू राजपुरे या ग्रामस्थाने स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details