सातारा - प्रतापगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा गड आहे. येथील तटबंदीच्या बुरुजाखालील भाग मोठ्या प्रमाणात ढासळला होता. या पार्श्वभूमीवर सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळय़ांनी येथील दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. हे तटबंदीच्या संवर्धनाचे काम या मावळ्यांनी अवघ्या ९४ दिवसांत पूर्ण केले आहे. दरम्यान, हे काम पूर्ण झाल्याची घोषणा खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
'तटबंदीच्या पायाखालील झाले होते भागाचे भूस्खलन'
गेल्या पावसाळ्यात जून महिन्याच्या सुरूवातीला तटबंदीच्या पायाखालील भागाचे भूस्खलन झाले होते. याची माहिती मिळ्याल्यानंतर सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमगुंडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत येथील परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर येथील दुरुस्थिच्या कामाला सुरूवात केली. तसेच येथील बांधकामाबाबत 'चंदनकर इंजिनीअरींग रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड' यांच्यासोबत चर्चा झाली. कॉलेज ऑफ इंजिनिअरीगं डॉ. भोसले यांच्याशीही चर्चा झाली आणि कामाचे स्वरूप निश्चित करण्यात आले. दरम्यान येथील स्थानिकांच्या हस्ते (२७ जानेवारी २०२१) ला भूमिपूजन करण्यात आले. आधुनिक तंत्राचा वापर करत हे काम पार पडले. यामध्ये शॉटक्रिट फवारणी तंत्रज्ञान, ड्रिलींग, बोलटिंग-ग्राऊटींग, तटबंदीच्या पायावर वजन न वाढवता, जिओ फोम, जिओ नेट, वायर रोप, बेअरिंग प्लेटचा वापर करण्यात आला. बांद्रा सिलिंकला जी वायर रोप लागली ती येथे वापरण्यात आली. लोखंडी तारांची जाळी, तराई काम करण्यात आले.