कराड (सातारा) - रस्त्यात सापडलेली मौल्यवान ऐवजाची पर्स कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी ताब्यात घेऊन, संबंधित महिलेला परत केली आहे. नगराध्यक्षांच्या या प्रामाणिकपणाचे कराडमध्ये कौतुक होत आहे. या पर्समध्ये सुमारे दोन लाखांचा ऐवज होता.
गुरुवारी सायंकाळी कराड नगरपालिकेच्या बजेटची विशेष सभा होती. सभा संपल्यानंतर नगराध्यक्षा आपल्या शासकीय वाहनातून शहरात सुरू असलेल्या कामांची पाहाणी करत होत्या. कामांची पाहणी करून झाल्यानंतर घरी जात असताना, बुधवार पेठेतील आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात त्यांना रस्त्यावर पर्स पडल्याचे दिसले. त्याचवेळी एक दाम्पत्य ती पर्स उचलताना त्यांना दिसले, परंतु नगराध्यक्षांनी त्यांना ती पर्स पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे सांगताच ते दाम्पत्य घटनास्थळावरून निघून गेले. त्यानंतर नगराध्यक्षांनी आपल्या स्वीय सहाय्यकाला ती पर्स ताब्यात घ्यायला लावली.