सातारा : राज्यातील राजकीय परिस्थिती सध्या अस्थिर असल्याचे मोठे वक्तव्य माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. कराड बाजार समितीच्या निणडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. कराड बाजार समितीच्या निवडणुकीसाठी झालेली भाजप-राष्ट्रवादीची युती ही दुष्ट आणि अभद्र युती असल्याचा जोरदार हल्लाबोलही त्यांनी केला.
विलासकाकांच्या पश्चात पहिली निवडणूक :पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून कराडची बाजार समिती स्वातंत्र्यापूर्वी निर्माण झाली. स्वातंत्र्य सैनिक शामराव पाटील हे पहिल्यांदा सभापती झाले. त्यानंतर विलासकाकांनी बाजार समितीच्या प्रगतीसाठी घाम गाळला. कराडसारख्या मोठ्या शहरात मोठी जागा मिळवत फळ, भाजीपाला मार्केट, बैल बाजार, मसूर, उंब्रज येथे उप आवार या सुविधा त्यांनी निर्माण केल्या. बाजार समितीकडे आज दहा कोटी रुपयांचा नफा आहे. विलासकाकांच्या पश्चात पहिली निवडणूक होत आहे.
विरोधकांनी संस्था बळकावल्या :भाजपचे प्रदेश सरचिटणीस अतुल भोसले, राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर घणाघाती टीका करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराड तालुक्यातील विशिष्ट लोकांनी आयुष्यभर केवळ संस्था बळकावल्या. त्यातून त्यांनी स्वतःचे आर्थिक विश्व उभे केले. अशा लोकांच्या हातात कराडची बाजार समिती द्यायची का? विरोधकांनी दुष्ट, अभद्र युती करून बाजार समितीला गिळंकृत करण्यासाठी आखलेला डाव मतदारांनी उधळून लावण्याचे आवाहन त्यांनी केले.