सातारा : जिल्हा प्रशासनाच्यावतीने किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधून 'जय जय महाराष्ट्र माझा' या राज्यगीताची धूम वाजवून पोलीस बॅन्ड पथकाने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. यावेळी शिवप्रेमींनी दिलेल्या घोषणांनी प्रतापगड दुमदुमून गेला.
शिवाजी महाराजांचे कार्य प्रेरणादायी :जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य प्रेरणादायी असून या कार्याचा तरुण पिढीने आदर्श घेऊन आपली वाटचाल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले.
छत्रपतींच्या संकल्पनेतील समाज घडवा :प्रतिवर्षी शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कल्पनेतील समाज घडवण्यासाठी प्रत्येकाने महाराजांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करावी. तरुणांनी छत्रपतींच्या संकल्पनेतील समाज घडविण्यासाठी आपले योगदान द्यावे.