सातारा : येथिल जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था आणि संबंधित अभ्यासकांना छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांच्या समाधीची जागा शोधण्यात यश मिळाले आहे. प्राचिन दस्तावेज आणि उपलब्द नकाशांचा आधार घेत हे समाधी स्थळ निश्चिती करण्यात आले आहे.
गावाला ऐतिहासिक वारसा : राजधानी साताऱ्यातील माहुली हे गाव धार्मिक अंगाने प्रसिद्ध आहेच या शिवाय ते अप्रतिम कलाकुसरीने नटलेल्या वास्तूंमुळे पण प्रसिद्ध आहे. माहुलीचा परिसर हा साताऱ्याचा ऐतिहासिक वारसा आहे. या कला वारशा मध्ये सतराव्या शतकापासून बांधलेली मंदिरे, नद्यांवरचे घाट तसेच राजघराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या समाधींचा समावेश आहे. कालौघात हा वारसा, आणि याबद्दलची माहिती विस्मृतीत जात गेली. त्यामुळे जुन्या कागदपत्रांच्या आधारे त्यां इतिहासाचे नव्याने संशोधन होत आहे.
येसूबाईंचा मृत्यू : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी व सातारा शहराचे संस्थापक छत्रपती शाहू महाराजांच्या मातोश्री येसूबाई यांचे इतिहासातील महत्त्व अनन्य साधारण आहे. त्या सुमारे तीस वर्षे औरंगजेबाच्या नजर कैदेत होत्या त्यानंतर 1719 मध्ये त्यांचे साताऱ्यात आगमन झाले. त्यानंतर शेवटपर्यंत त्यांचे वास्तव्य साताऱ्यातच होते. त्यांच्या मृत्यूची खरी तारीख उपलब्ध नाही. परंतु 1729 च्या दरम्यान त्यांचा साताऱ्यात मृत्यू झाला असा अभ्यासकांचा दावा आहे.
समाधी स्थान विस्मृतीत :जवळपास तीनशे वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात राजघराण्यातील इतर समाधींप्रमाणे येसूबाईंच्या समाधीचे स्थानदेखील विस्मृतीत गेले. मात्र येसूबाईंच्या समाधीच्या समाधिचा शोध थांबला नव्हता. इतिहास संशोधक बेंद्रे यांनी 1970 च्या दशकात येसूबाईंच्या समाधी बाबत ही समाधी छत्रपती. शाहू महाराजांच्या समाधी जवळ असावी असा कयास लावला होता. त्यानुसार त्या भागात उत्खनन करण्यात आले होते. पण ठोस काही सापडले नव्हते.