कराड (सातारा) - कराड शहरापासून पाच ते सहा किलोमिटर अंतरावरील वारूंजी आणि केसे या दोन गावांतील सुमारे शंभर एकराहून अधिक क्षेत्रातील ऊस बुधवारी (दि. 25 नोव्हेंबर) सायंकाळी जळून खाक झाला. आगीची नेमकी घटना कशामुळे घडली, हे स्पष्ट झालेले नाही. पण, दोन्ही गावांतील शेतकर्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. तोडणीला आलेला ऊस जळाल्याने शेतकर्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले.
एकेकाळी वारूंजी आणि केसे ही गावे दर्जेदार गुळ निर्मितीसाठी महाराष्ट्रासह गुजरात राज्यात प्रसिध्द होती. दोन्ही गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या गुळाची निर्मिती होत होती. केसे या गावातील गुळाला गुजरातमध्ये प्रचंड मागणी होती. जमिनीचा चांगला पोत आणि उसाच्या चांगल्या उत्पादनामुळे दोन्ही गावांचा सातारा जिल्ह्यात लौकीक आहे.
बुधवारी (दि. 25 नोव्हेंबर) दुपारनंतर अचानक कोयना नदीकाठच्या क्षेत्रातील उसाला आग लागली. तोडणीला आलेल्या उसाला वाळलेला पाला असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. गावापासून ऊस क्षेत्र दूर असल्यामुळे लोकांची वर्दळ नव्हती. त्यामुळे आगीची माहिती लवकर समजली नाही. त्यामुळे आग झपाट्याने पसरत गेली आणि आगीने शेकडो एकर क्षेत्रातील उसाला आपल्या कवेत घेतले. आगीची घटना समजल्यानंतर दोन्ही गावांमधील शेतकर्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पण, आगीच्या रौद्र अवतारापुढे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. या आगीत वारूंजी आणि केसे या दोन गावांतील शेतकर्यांच्या शंभरहून अधिक एकर क्षेत्रातील उसाचे पीक जळून खाक झाले. तोडणीला आलेला ऊस जळाल्याने शेतकर्यांचे डोळे पाणावले होते. या घटनेत शेतकर्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
हेही वाचा -म्हसवडच्या सिद्धनाथांचा शाही विवाहाचा सार्वजनिक सोहळा रद्द; मंदिरही राहणार बंद