कराड (सातारा) -कोयना धरणातील पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दुपारी 1 फुटाने उघडण्यात आले आहेत. धरणाचा सांडवा आणि पायथा वीजगृहातून 10 हजार 264 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने सायंकाळी 5 वाजता धरणाचे 2 फूट 6 इंचाने उघडून 25 हजार क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडला जाणार असल्याचे धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. कोयना-कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
कोयना धरणाची पाणीपातळी
आज सकाळी 8 वाजता 2161 फूट 11 इंच तर धरणातील पाणीसाठा 103.19 टीएमसी इतका झाला होता. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणामध्ये पाण्याची आवक वाढत आहे. तसेच पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोयना धरणाचे वक्र दरवाजे उघडण्याचा तसेच पायथा वीजगृह कार्यान्वित करून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय कोयना धरण व्यवस्थापनाने घेतला. दुपारी 2 वाजता वक्र दरवाजे 1 फुटाने उघडून धरणाचा सांडवा आणि वीजगृहातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
धरणामधील पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढविला जाणार आहे. त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे. सध्या धरणातील पाणीसाठा 103.84 टीएमसी तर धरणातील पाण्याची पातळी 2162 फूट 5 इंच आहे. धरणाच्या वक्र दरवाजातून 9 हजार 214 आणि पायथा वीजगृहातून 1 हजार 50, असा एकूण 10 हजार 264 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या कोयना धरणात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे दरवाजे 2 फूट 6 इंचाने उघडले जाणार आहेत. सांडवा आणि पायथा वीजगृहातून एकूण 25 हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू केला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.