कराड (पाटण) - महाराष्ट्राची वरदायिनी आणि उद्योग विश्वाचा कणा समजल्या जाणार्या सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर प्रचंड आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या कोयना धरणातून 23 हजार 714 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातील पाणीसाठा शुक्रवारी (23 जुलै) सकाळी 11 वाजता 83.65 टीएमसी झाला आहे. धरणात 2 लाख 54 हजार 826 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर, 35 हजार 171 क्युसेस पाण्याचा सध्या कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.
कोयना-कृष्णा नदीकाठावर महापुराचा धोका वाढला
धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाची संततधार आणि धरणातून सोडण्यात येणार्या पावसामुळे कोयना-कृष्णा नदीकाठावर महापुराचा धोका वाढला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरूवारी (22 जुलै) दिवसभरापासून शुक्रवारी पहाटे 6 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी हाती आली आहे. ही आकडेवारी पाहता कोयना नगरमध्ये शुक्रवारी पहाटे 6 पर्यंत 598 मिलीमीटर, नवजा येथे सर्वाधिक 726 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 535 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे 6 वक्र दरवाजे सकाळी 10 वाजता 5 फुटांनी उचलण्यात आले आहेत.
पाटणमध्ये अनेक पूल पाण्याखाली, वांग नदीला पूर
डोंगराळ आणि पावसाचे आगार समजल्या जाणार्या पाटण तालुक्यालाही पावसाने झोडपून काढले आहे. कोयना नदीला मिळणार्या काफना, केरा यासारख्या उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे कोयना नदीला महापूर आला आहे. कराड-चिपळूण महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पाटण बसस्थानक जलमय झाले आहे. बस स्थानकाबाहेरील रस्ता देखील पाण्यात आहे. महिंद आणि मराठवाडी धरण देखील पूर्ण क्षमतेने भरले आहे. दोन्ही धरणांमधून विसर्ग सुरू असल्यामुळे वांग नदीलाही पूर आला आहे.
तांबवे पुलावरील पाणी ओसरले, पण पुराचा धोका कायम
कराड तालुक्यातील तांबवे येथील कोयना नदीवरील पूल गुरूवारी (22 जुलै) रात्री पाण्याखाली गेला होता. गावातील स्मशानभूमी देखील पाण्याखाली गेली होती. बाजारपेठेत पाणी आल्यामुळे पुर्वानुभव लक्षात घेऊन नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आले. शुक्रवारी सकाळी पुलावरील पाणी ओसरले. परंतु, सुरु असलेला पावसाचा जोर आणि कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे तांबवे गावाला महापूराचा धोका संभवत आहे. प्रशासकीय यंत्रणा तांबवे गावातील पूरस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. गुरूवारी सायंकाळी प्रशासनाने तांबवे गावासाठी बोट उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कराडच्या प्रीतिसंगम बागेत शिरले पाणी
कोयना आणि कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ असलेल्या प्रीतिसंगम बागेत गुरूवारी रात्रीच पाणी शिरले. तसेच कराडचे ग्रामदैवत असलेल्या कृष्णामाई मंदिरातही पुराचे पाणी आले आहे. कृष्णाघाट पाण्याखाली गेला आहे. पुराचे संकट ओळखून प्रशासनाने कृष्णा घाटाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कराडकरांनी 2005, 2006 आणि 2019 साली आलेले तीन महापूर पाहिले आहेत. यंदाही तशीच भयानक परिस्थिती उद्भवली आहे.
पाटण कॉलनीसह साई मंदिर पाण्यात
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे निवासस्थान असणार्या पाटण कॉलनीत गुरूवारी रात्रीच महापुराचे पाणी शिरले. त्याठिकाणच्या झोपडपट्टीतील नागरिकांचे कराड नगरपालिका प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. तसेच दत्त चौकातील साईबाबा मंदिरात देखील पाणी भरले आहे. कोयना धरणातून सोडण्यात येणार्या पाण्यामुळे कराडच्या दत्त चौकात पुराचे पाणी येण्याची शक्यता वाढली आहे.
सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 266 मिलीमीटर पाऊस
सातारा जिल्ह्यात गुरूवारी सकाळपर्यंत सरासरी 60.7 मिलीमीटर आणि आतापर्यंत 266 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.