कराड (सातारा) - राज्यात सर्वात प्रथम कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने १५० बेडचे कोविड सेंटर उभारले आहे. दोन दिवसांत हे कोविड सेंटर शासनाकडे हस्तांतर केले जाणार आहे. या सेंटरमध्ये ५० रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड आणि १०० रूग्णांवर विलगीकरणासह उपचार करता येईल, असा कक्ष तयार केला आहे. कारखान्याचे संचालक तथा राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे सुपूत्र जशराज पाटील यांनी शनिवारी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली. दिवंगत पी. डी. पाटील हे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या दूरदृष्टीने कारखाना कार्यक्षेत्रातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. शेतकरी हिताच्या योजना राबवत त्यांनी राज्यात सह्याद्री पॅटर्न निर्माण केल्याचे जशराज पाटील म्हणाले. कोरोनाच्या संकटकाळात सहकारी साखर कारखान्यांनी कोविड सेंटर्स उभारावेत, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत राज्यात सर्वात प्रथम कराडच्या सह्याद्री कारखान्याने सह्याद्री कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात कोविड सेंटर उभारले असल्याचे जशराज पाटील म्हणाले.