कराड (सातारा)- पश्चिम महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचे प्रस्ताव विचाराधीन असून जलमार्गांनाही प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी कराड येथे केले. 6 हजार कोटींच्या रस्ते प्रकल्पाचे लोकार्पण तसेच कोनशिला कार्यक्रमात ते बोलत होते.
महापुरात रस्ता बुडणार नाही, अशा रस्त्यांची बांधणी करू
सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी एकत्रित बैठक घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकार्यांना आराखडा द्यावा. त्या आरखड्यानुसार कामे केली जातील. एकही रस्ता महापुरात बुडणार नाही, अशा रस्त्यांची आपण बांधणी करू, असे नितीन गडकरी म्हणाले.
कोल्हापूर-सांगली मार्गाचे काम पुढील सहा महिन्यात होईल सुरू
पुणे-कोल्हापूर, पुणे-अहमदनगर, पुणे-सोलापूर, असा मेट्रो प्रकल्प राबविण्याचा आपला विचार आहे. ही मेट्रो युरोपियन मेट्रोसारखी असेल. तिचे स्पीड ताशी 140 एवढे असेल. 12 हजार कोटी रूपये खर्चातून आळंदी-पंढरपूर हा आषाढी पालखी मार्ग होत आहे. तसेच खंबाटकी घाटात आणखी एक बोगदा निर्माण होत आहे. कोल्हापूर ते सांगली मार्गाचे काम पुढील सहा महिन्यात सुरू होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.