महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात पुणे-बंगळूरू महामार्गावर भीषण अपघात; एक ठार, दोन गंभीर - ccident on Pune-Bangalore highway

कराड ते सातारा जाणाऱ्या मार्गावर सकाळी १० च्या सुमारास हा थरारक अपघात झाला. स्विफ्ट कारने धडक दिलेल्या वेगवेगळ्या दुचाकींपैकी एका दुचाकीवरील स्वार महामार्गावरून सुमारे २५ ते ३० फूट खाली सेवारस्त्यावर डोक्यावर पडला होता.

Terrible accident on Pune-Bangalore highway in Satara
साताऱ्यात पुणे-बंगळूरू महामार्गावर भीषण अपघात

By

Published : Jun 26, 2020, 3:12 PM IST

Updated : Jun 26, 2020, 4:06 PM IST

सातारा - जिल्ह्यात वळसे गावाजवळ पुणे-बंगळूरू महामार्गावर एका भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कारने तीन दुचाकींना पाठीमागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव राजेंद्र हणमंत घाडगे (45 रा. समर्थगाव, ता. सातारा) असून त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

कराड ते सातारा जाणाऱ्या मार्गावर सकाळी १० च्या सुमारास हा थरारक अपघात झाला. कारने धडक दिलेल्या वेगवेगळ्या दुचाकींपैकी एका दुचाकीवरील स्वार महामार्गावरून सुमारे २५ ते ३० फूट खाली सेवारस्त्यावर डोक्यावर पडला होता. राजेंद्र हणमंत घाडगे हे जिल्हा परिषदेते काम करणारे कर्मचारी होते, त्यांचा अपघातानंतर सातारामधील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जिल्हा परिषदेत ते आरोग्यसेवक म्हणून कार्यरत होते. तर या अपघातात अमर शिवाजी पानस्कर (32, रा. मल्हारपेठ, ता.पाटण) आणि कुमार माणिक पोतदार (36, रा. सासपडे, ता. सातारा) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा...पुलवामात चकमक.. सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

अपघातानंतर एका दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला होता. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे. तर वळसे ग्रामस्थांनी जखमींना तातडीने उपचारासाठी सातारा येथील रुग्णालयात पाठवले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ खोळंबली होती. बोरगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.

Last Updated : Jun 26, 2020, 4:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details