सातारा - ब्युटी पार्लरमध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने दोन बांगलादेशी तरूणींना पश्चिम बंगालमार्गे मुंबई, हैदराबादमध्ये आणून वेश्या व्यवसायात ढकलणार्या टोळीच्या रचकोंडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याने तिच्या बहिणीने तस्करांशी भांडण केले आणि लहान बाळाला घेऊन बाजारात गेली. रस्त्यावर रडत उभी असताना ती पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी तिची विचारपूस केल्यानंतर आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आणि सहा जण गजाआड गेले.
पोलीस आयुक्तांनी सांगितले -तेलंगणातील रचाकोंडा पोलीस मुख्यालयाच्या हद्दीतील उप्पल पोलीस ( Uppal Police in Karad ) ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ता मुलींच्या शोधासाठी तेलंगणाचे पोलीस बुधवारी साताऱ्यातील कराडमध्ये दाखल झाले. कराड शहर पोलीस ठाण्यातील बंदोबस्त घेऊन त्यांनी पुणे -बंगळुरू महामार्गावरील हॉटेल नवरंगवर छापा मारला. हॉटेलच्या लॉजवर त्यांना अल्पवयीन बांगलादेशी मुलगी सापडली. पोलिसांनी तिच्यासह लॉजमधील तिघांना ताब्यात घेतले. तत्पुर्वी तेलंगणा पोलिसांनी राजस्थान तसेच मुंबईतदेखील छापे मारून संशयितांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती ही रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी दिली आहे.
पीडितेच्या तक्रारीनंतर गतीने झाला तपास -उप्पल (तेलंगणा) पोलीस ठाण्यात दि. 11 जुलै रोजी पीडित बांगलादेशी तरूणीने तक्रार नोंदवली. त्यामुळे देशभरात ऑनलाईन मानवी तस्करीचे रॅकेट कार्यरत असल्याचा प्रकार उघडकीस आला. रचकोंडा पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन राजस्थान, झारखंडसह महाराष्ट्रातील मुंबई आणि सातारा जिल्ह्यात छापे टाकून अनैतिक व्यापारासाठी मानवी तस्करी करणार्या 8 जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला. फिर्यादी तरूणीने आपली लहान बहिण सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये असल्याचे सांगितले. त्यामुळे रचकोंडा पोलीस कराडमध्ये दाखल झाले. कराडमधील नवरंग लॉजवर छापा मारून पोलिसांनी अल्पवयीन मुलीची सुटका केली. तसेच लॉज मालक, व्यवस्थापक आणि कामगाराला अटक केली. मानवी तस्करीच्या रॅकेटमधील सतीश रजक (झारखंड), वृष्टी खातून (बांगलादेश), दीपक चंद (राजस्थान), सुरेश बाळू सोनावणे, अस्लम चांद पटेल, अरुण रामचंद्र जाधव (रा. कराड, जि. सातारा) यांना अटक करण्यात आली आहे, तर कुमावथ प्रकाश (राजस्थान) आणि प्रियांका (पश्चिम बंगाल) हे दोन संशयीत फरार आहेत. अटक केलेल्या संशयितांवर फसवणूक, पिटा कायद्यासह पोक्सो, बलात्काराच्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून स्फ्टि कार, मोबाईल फोन, सिमकार्ड आणि बनावट ओळखपत्रे देखील जप्त केली आहेत.
ब्युटी पार्लरमध्ये नोकरीच्या बहाण्याने मुलींची तस्करी - ब्युटी पार्लरमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने बांगलादेशी तरूणींना कोलकातामार्गे भारतात आणून देशाच्या विविध भागात ऑनलाईन मानवी तस्करीचे रॅकेट चालवले जात होते. आंतरराज्य मानवी तस्करी टोळी अनेक राज्यांतील महिला आणि तरुणींना विकत घेऊन वेश्या व्यवसायासाठी तस्करांना पुरवत होते. राजस्थानमधील दीपक चंद आणि झारखंडचा सतीश रजक हे तस्कर अनेक वर्षांपासून मानवी तस्करीच्या व्यवसायात कार्यरत आहेत. महिला आणि तरूणींकडून वेश्या व्यवसाय चालवून अवैध मार्गाने ते पैसे कमवत होते. या तस्करांनी ऑनलाईन डेटिंग वेबसाईट तयार केली होती. त्यावर महिला आणि मुलींचे अर्धनग्न फोटो अपलोड करून तस्करांना आणि त्यांच्या ग्राहकांना महिला, तरूणी पुरवल्या जात होत्या. फ्लाइट, ट्रेन आणि बसच्या तिकिटांची व्यवस्था केली जात होती. नेट बॅकिंगच्या माध्यमातून ते अर्थिक व्यवहार करत होते.