सातारा- दुचाकीवरून निघालेल्या शिक्षकाला अडवत त्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून स्टील पाईप आणि दांडक्याने जबर मारहाण करण्यात आल्याची घटना पाटण तालुक्यातील जळव घाटात घडली आहे. या हल्ल्यात शिक्षकाच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. याप्रकरणी तारळे (ता. पाटण) येथील चौघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य तिघेजण फरार झाले आहेत.
साहील सलीम हकिम (वय 23, रा. रामापूर, ता. पाटण), असे जखमी शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्यावर सातार्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संग्राम पोपटराव देशमुख (वय 19), स्वप्नील तुकाराम माळी, अक्षय जाधव, बाबू विकास सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
ढोरोशी (ता. पाटण) येथील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रशिक्षण संपवून साहील हकिम आणि बळीराम लोहार हे दुचाकीवरून जळव घाटातून पाटणकडे निघाले होते. यावेळी चार संशयितांनी त्यांची दुचाकी थांबविली. बळीराम लोहार हे दुचाकी चालवित होते. संशयितांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांना बाजुला ढकलून दिले. यावेळी साहील हकिम यांना तुला ठेवतच नाही, खल्लास करून टाकतो, असे म्हणत स्टील पाईप व लाकडी दांडक्याने शिक्षकाच्या डोक्यावर जबर मारहाण केली. त्यानंतर ते डोंगराच्या बाजुला पळून गेले.