सातारा (कराड) - कोरोना विरोधातील लढाईसाठी राज्यातील प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली १८ सदस्यांच्या टास्क फोर्सची निर्मीती केली आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि माजी खासदार भालचंद्र मुणगेकर हे या समितीचे समन्वयक आहेत.
कोरोनाविरोधातील लढ्यात काँग्रेसची 'टास्क फोर्स' करणार सरकारला मदत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली १८ सदस्यांच्या 'टास्क फोर्स'ची स्थापना केली आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि माजी खासदार भालचंद्र मुणगेकर हे या समितीचे समन्वयक आहेत.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटात राज्य सरकारला मदत कार्यात सहकार्य करणे. आवश्यकता असेल तेथे सूचना व मार्गदर्शन करणे. काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू असलेले मदत कार्य आणखी गतिमान करणे. कोरोनाच्या संदर्भात सरकारच्या उपाययोजना आणि वास्तव परिस्थितीबाबत माहिती घेऊन सरकारला साप्ताहिक अहवाल सादर करणे, अशी या फोर्सची कामे आहेत. यासाठी ऑडिओ कॉन्फरन्स, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही टास्क फोर्स कार्यरत आहे.
या समितीमध्ये खा. राजीव सातव, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, मुजफ्फर हुसेन, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुशीबेन शहा, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, आमदार संग्राम थोपटे, आ. रणजीत कांबळे, माजी आमदार कल्याण काळे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस गणेश पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, सेक्रेटरी डॉ. अमोल देशमुख यांचा समावेश आहे.