सातारा - एका ब्रँडच्या खाद्यपदार्थांसाठी 'डिलिव्हरी बाॅय' म्हणून तो काम करायचा. त्याचवेळी रेकी करून तो डाव साधत असे. पण पोलिसांच्या तावडीतून तो सुटला नाही. तो सापडला आणि सातारा शहर व परिसरातील ४० घरफोड्यांच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २० लाख २० हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
साताऱ्यातील ४० घरफोड्यांची कबुली पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यावेळी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, विजय सात्तापा ढोणे (रा. देगाव फाटा, मुळ रा. बिदर, कर्नाटक) असे संशयिताचे नाव आहे. 'स्विगी' या कंपनीमार्फत खाद्यपदार्थांच्या डिलीव्हरीचे काम तो सातारा शहरात करत होता.
हेही वाचा -विम्याचे पैसे मिळवण्यासाठी मित्राची हत्या, स्वतःचा मृत्यू झाल्याचा केला बनाव
स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जहाड व त्यांच्या पथकाला संबंधित तरुण शाहनगर परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळला. पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने श्यामलीला, लक्ष्मीनगर, एम.आय.डी.सी सातारा येथील घरांमध्ये रात्रीच्या वेळी घरफोडी केली असल्याची कबुली दिली. सखोल तपासात त्याने एकट्याने सातारा शहरामध्ये तब्बल ४० घरफोड्या केल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या चोऱ्यांमध्ये चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप, डिजीटल/रोल कॅमेरे, घडयाळे, अर्टिफिशियल ज्वेलरी, घरफोडी करताना वापरण्यासाठीच्या बनावट चाव्या, कटावणी, सुरे असा एकूण २० लाख २० हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चोरीचे सोने ठेवले गहाण
संशयिताने चोरीच्या दागिन्यांच्या सुरक्षिततेसाठी नामी शक्कल लढवली होती. अत्यंत चलाखीने चोरी केलेले सोने बँकेत गहाण ठेवून त्याने त्यावर सोने तारण कर्ज घेतले होते. पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जहाड यांनी बँकेशी पत्रव्यवहार करून सोने हस्तगत केले.
हेही वाचा -प्रजासत्ताकदिनानिमित्त कराडात देशभक्तीपर समूह गीत-गायन स्पर्धेला प्रारंभ