सातारा- पालिकेचा उपमुख्याधिकारी संचित धुमाळ याच्यासह आरोग्य विभागातील अन्य दोन अधिकाऱ्यांना पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने निलंबित केले आहे. नगरपालिकेतील घंटागाडी ठेक्याची अनामत रक्कम परत मिळावी म्हणून अडीच लाखांची लाच स्विकारणारल्याने ही कारवाई केली गेली. कारवाई शुक्रवारी रात्री उशिरा झाली असून त्याबाबतची नोटीसही रविवारी पालिकेला प्राप्त झाली आहे. या प्रकरणातील आणखी एक लाचखोर आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे अजूनही फरार असून त्याच्या शोधात तीन पथके तैनात आहेत.
सातारा पालिकेच्या उपमुख्याधिकाऱ्यासह दोन अधिकाऱ्यांचे निलंबन, अडीच लाखांची घेतली होती लाच - सातारा पालिकेच्या उपमुख्याधिकाऱ्याचे निलंबन
पालिकेचा उपमुख्याधिकारी संचित धुमाळ याच्यासह आरोग्य विभागातील अन्य दोन अधिकाऱ्यांना पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने निलंबित केले आहे. नगरपालिकेतील घंटागाडी ठेक्याची अनामत रक्कम परत मिळावी म्हणून अडीच लाखांची लाच स्विकारणारल्याने ही कारवाई केली गेली. कारवाई शुक्रवारी रात्री उशिरा झाली असून त्याबाबतची नोटीसही रविवारी पालिकेला प्राप्त झाली आहे.
सातारा नगरपालिकेत 8 जूनला अडीच लाखांची लाच घेताना उपमुख्याधिकारी संचित धुमाळ, आरोग्य निरीक्षक प्रवीण यादव, गणेश टोपे आणि राजेंद्र कायगुडे आढळले होते. या कारवाईत धुमाळ, यादव आणि टोपे यांना एसीबीने अटक केली होती. मात्र, कायगुडे फरार झाल्यामुळे त्याला अटक करण्यात आली नव्हती. कायगुडे वगळता उर्वरित तिन्ही आरोपींची दोन दिवसांपूर्वी जामिनावर मुक्तता झाली. दरम्यान, आरोग्य निरीक्षक असलेल्या यादव, टोपे आणि कायगुडे या तिघांना तात्काळ निलंबित करण्याची कारवाई सातारा पालिका मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केली होती. मात्र, धुमाळ याच्या निलंबनाचा विषय सातारा पालिकेच्या अखत्यारित नसल्यामुळे त्याला निलंबित करता आले नव्हते.
धुमाळच्या निलंबनाच्या अनुषंगाने मुख्याधिकारी गोरे यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यावर राज्य सरकारने तात्काळ पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाला कळवत त्याच्या निलंबनाचा अध्यादेश काढण्यात यावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने सातारा पालिकेला अध्यादेश पाठविला होता. याबाबत कुठेही वाच्यता करण्यात आली नव्हती. दरम्यान, आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे हा अजूनही फरार असल्यामुळे त्याचा शोध पोलिसांकडून सुरुच आहे. तो सापडल्यानंतर याप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची माहितीही पुढे येणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्यामुळे सातारा पालिकेत अस्वस्थता आहे.