सातारा -जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या निवडणुका यापूर्वीझाल्या नाहीत. मात्र, आता जाती-धर्माच्या नावावर निवडणुका होऊ लागल्या आहेत. समाजभूषण हणमंतराव साळुंखे यांनी समाजवादी समाजरचनेचा विचार घेऊन जाती-धर्माच्या पलीकडे समाजकारण आणि राजकारण करण्याचा विचार मांडला. त्यांच्या या विचारांचा यज्ञ तेवत ठेवणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. खटाव येथील समाज भूषण हणमंतराव साळुंखे यांच्या ग्रंथप्रकाशन व पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा -'डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होईल'
शिंदे मार्गदर्शनावेळी पुढे म्हणाले, माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले, महाराष्ट्राच्या सारस्वताला विद्या प्रदान करणारे डॉ. शिवाजीराव भोसले व दबलेल्या लोकांच्या जीवनाला उर्जितावस्था देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे हणमंतराव साळुंखे तात्या यासारख्या विद्वानांचे कलेढोण हे गाव आहे. साळुंखे तात्या समाजवादी विचारसरणीचे पक्के विचारवंत होते. डॉ. लोहिया, ना.ग. गोरे, ग. प्र. प्रधान, एस .एम. जोशी, साने गुरुजी यांच्या मुशीत त्यांचे नेतृत्व तयार झाले होते. ज्या विचारातून माणूस उभा राहतो, त्याला फार महत्त्व आहे. विविध समाजातील लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व दिले, देश उभा केला पण त्यांना काय मिळाले? असा सवालही शिंदे यांनी यावेळी केला.