सातारा - नागरिकांनी सहकार्य न केल्यास सरकारला कठोर पावले उचलावी लागतील, असा सतर्कतेचा इशारा साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिला. कोरोनाला अटोक्यात आणण्यासाठी शासनाचे नियम पाळण्याचे आवाहन त्यांनी सातारकरांना केले. दरम्यान या अनुषंगाने प्रशासनाने जिल्ह्यात 15 एप्रिलपर्यंत रात्री 8 ते सकाळी 7 या वेळात संचारबंदी लागू केली आहे.
नियम पाळण्याचे आवाहन साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी नागरिकांना केले. साताऱ्याचे पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल यांनी आज रात्री संचारबंदी लागू झाल्यानंतर शहरात फिरून पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला. यावेळी ' ईटीव्ही भारत'शी बोलताना त्यांनी लॉकडाऊनच्या अफवेचे खंडन केले. लॉकडाऊन कोणालाच नको आहे. पण जनतेने या काळात सहकार्य केले नाही. तर कडक पावले उचलावी लागतील, असेही त्यांनी म्हटलं.
गेल्या आठवडाभरापासून रोज सुमारे 400 बाधित रुग्ण समोर येत आहेत. हा वेग असाच वाढत राहिल्यास एप्रिल अखेर पंधराशे ते दोन हजारपर्यंत रुग्णांमध्ये प्रतिदिनी वाढ होऊ शकते. सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला असून बाधितांचे आकडे गेल्या साडेपाच महिन्यात उच्चांकी 500 पर्यंत पोहोचले. दररोज मोठ्या संख्येने बाधित वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 64 हजार 506 बाधित स्पष्ट झाले आहेत.
नव्या आदेशानुसार -
- जिल्ह्यात रात्रीचे आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी
- राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व अत्यावश्यक सेवा चालू
- इयत्ता दहावी व त्या पुढील सर्व वर्ग, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था चालू
- पाचपेक्षा जास्त व्यक्तींना रात्री एकत्र येण्यास मनाई
- चाचण्यांचे प्रमाण विशेष प्रयत्न करून 70 टक्क्यांपेक्षा अधिक वाढविणार