पाटण (सातारा) - पाटण तालुक्यातील आंब्रुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विश्वनाथ लक्ष्मण लाड (वय 45, रा. रामापूर-पाटण), असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. दरम्यान, आपण आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट पोलिसांना आढळल्याने आत्महत्येच्या घटनेमागील कारणाचा उलगडा झाला आहे.
विश्वनाथ लाड हे मूळचे गुंजाळी (ता. पाटण) गावचे रहिवासी होते. सध्या ते पाटणमधील रामापूरमध्ये वास्तव्यास होते. तसेच आंब्रुळे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ते शिक्षक होते. बुधवारी सकाळी पत्नीसह ते नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यासाठी मेंढोशीला गेले होते. पत्नीला लग्नात सोडून ते एकटेच पाटणमधील घरी आले. घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे पाटण तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मृत विश्वनाथ लाड यांचे भाऊ विठ्ठल गणपती लाड यांनी या दिलेल्या फिर्यादीवरून पाटण पोलीस ठाण्यात आत्महत्येच्या घटनेची नोंद झाली आहे. हवालदार के. आर. खांडे तपास करत आहेत.