कराड : ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टरने अचानक पेट घेतला. यात ट्रॅक्टर जळून खाक झाला. त्यामुळे ट्रॅक्टर मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावर बेलवडे हवेली (ता. कराड) हद्दीत ही घटना घडली. वार्यामुळे क्षणात आग भडकली. कराड नगरपालिका अग्निशामक दलाचा बंब आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
उडी मारल्याने चालकाला दुखापत नाही
सातारा जिल्ह्यातील कराडकडून उंब्रजकडेऊसाने भरलेला ट्रॅक्टर जात होता. बेलवडे हवेली गावच्या हद्दीत आल्यानंतर ट्रॅक्टरने अचानक पेट घेतला. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अचानक आग लागल्याने चालक हरिश्चंद्र केशव काशिद (रा. बीड) याने ट्रॅक्टर थांबवून बाहेर उडी मारली. यामुळे त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. दरम्यान, वार्याचा वेग जास्त असल्याने ट्रॅक्टरने काही वेळातच पेट घेतला. ट्रॅक्टरला लागलेल्या आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत होत्या.