महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ई टीव्ही भारत' इम्पॅक्ट; चारा छावण्यांचे तब्बल 123 कोटी रुपयांचे अनुदान जमा - चारा छावणी

जुलै महिन्यापासून चारा छावण्यांचे अनुदान न मिळाल्याने चारा छावणी चालक आर्थिक संकटात सापडले होते. खर्चाचा ताळमेळ बसवताना चारा छावणी चालक मेटाकुटीला आले होते.

fodder camps
चारा छावणी

By

Published : Dec 2, 2019, 10:27 PM IST

सातारा- जुलै महिन्यापासून चारा छावण्यांचे अनुदान न मिळाल्याने चारा छावणी चालक आर्थिक संकटात सापडले होते. खर्चाचा ताळमेळ बसवताना चारा छावणी चालक मेटाकुटीला आले होते. पंधरा दिवसात अनुदान मिळेल या आशेवर उधारीवर ऊस, पेंड आणले होते. मात्र, अनुदान न मिळाल्याने उधारी भागवताना अगोदर उसनवारी तर त्यानंतर टक्केवारीवर पैसे उचलून देणी भागवली. मात्र त्यानंतरही अनुदान न मिळाल्याने टक्केवारीने घेतलेल्या पैशांचे व्याज भागवताना चारा छावणी चालकांची दमछाक झाली होती.

सरकार स्थापनेसंदर्भातला गोंधळ सुरु असल्यामुळे चारा छावणी चालकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नव्हता. 'ई टीव्ही' भारत ने या प्रश्नी आवाज उठवल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. 21 नोव्हेंबरला चारा छावणी चालक मामूशेठ विरकर यांनी माजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची भेट घेवून चारा छावणी चालकांची व्यथा त्यांच्यासमोर मांडली. माजी मंत्री जानकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेवून त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. राज्यपाल कोश्यारी यांनी मदत व पुनर्वसनचे सचिव किशोर निंबाळकर यांना चारा छावणी चालकांचे अनुदान संबंधित विभागांकडे वर्ग करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पुणे विभागाचे 123 कोटी रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्याचे जुलैसाठी 15 कोटी 11 लाख व ऑगस्ट महिन्यासाठी 11 कोटी 63 लाख अनुदान पुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात आले. तर, 27 नोव्हेंबर रोजी माण प्रांताधिकारी कार्यालयाकडे जुलै व ऑगस्ट महिन्याचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे. अजूनही सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे अनुदान येणे बाकी आहे. मात्र, जुलै व ऑगस्ट महिन्याचे तरी अनुदान आले, त्यामुळे चारा छावणी चालकांनी समाधान व्यक्त केले. कागदपत्रांची पुर्तता केलेल्या चारा छावणी चालक संस्थांच्या खात्यावर अनुदान जमा केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details