सातारा: दहावीच्या निरोप समारंभाच्या काही तास आधी दुचाकी अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोन जण जखमी झाले. प्रतीक रमेश पाटील (रा. मरळी, ता. पाटण) असे मृत मुलाचे नाव आहे. अपघातातील प्रतीक आणि त्याचे दोन मित्र एका दुचाकीवरून फिरत होते. त्यावेळी टाटा सुमो गाडीला त्यांच्या दुचाकीने समोरून धडक दिली.
दुचाकीची टाटा सुमोला धडक:मल्हारपेठ पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार मरळी (ता. पाटण) येथील वत्सलादेवी विद्यालयात शनिवारी इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा शुभचिंतन व निरोप समारंभ होता. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी दहावीच्या वर्गातील प्रतीक पाटील, हर्षद पाटील आणि सुमित टोपले हे विद्यार्थी मोटरसायकलवरून फिरत होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते तिघे एकाच मोटरसायकलवरून मरळीहून देसाई कारखान्याच्या दिशेने जात असताना गणेश मंदिरा समोरील उताराला त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. दुचाकीने टाटा सुमो गाडीला जोराची धडक बसली.
एक जण जागीच ठार:या भीषण अपघातात दुचाकी चालविणारा प्रतीक पाटील हा जागीच ठार झाला. तर हर्षद पाटील आणि सुमित टोपले हे जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभदिनी अपघाती मृत्यू झाल्याने विद्यालयावर शोककळा पसरली. दहावीच्या परीक्षेपूर्वीच प्रतिकचा झालेला अपघाती मृत्यू मरळी परिसराला चटका लावून गेला. या अपघाताची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. एच. जगदाळे, पी. व्ही. पाटील हे तपास करत आहेत.