सातारा - जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या पाहता व जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सध्याचे निर्बंध आणखी 8 दिवस कायम ठेवले आहेत. केवळ रेशन व दूध वितरण, घरपोच फळ व भाजीपाल्याच्या विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. हे नवे आदेश 8 जूनपर्यंत लागू राहणार आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी -
नव्या आदेशानुसार, घरपोच दूध वितरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच शिवभोजन थाळी योजना फक्त पार्सल सुविधा सुरू राहील. घरपोच फळ व भाजीपाला सकाळी 7 ते दुपारी 3 या कालावधीत पूरविण्यास परवानगी राहील. स्वस्त धान्य दुकाने सकाळी 7 ते 11 या कालावधीत चालू राहतील. औषध दुकाने सकाळी 8 ते सायंकाळी 7 या कालावधीत चालू राहतील. तथापि हॉस्पिटलमधील औषध दुकाने 24 तास चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
शेतीविषय दुकानांना दुपारी तीनपर्यंत मुभा -
फळे, भाजीपाला घाऊक खरेदी विक्रीसाठी सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत चालू राहतील. या कालावधीत फक्त घाऊक व्यापाऱ्यांना खरेदी करता येईल. तेथे किरकोळ ग्राहक व किरकोळ विक्रेता यांना खरेदी करण्यास मनाई आहे. शेती विषयक सेवा व शेती सुरू राहण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असणारी बियाणे, खते आदींची दुकाने सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत चालू राहतील.