काटेकोर पद्धतीने शेती करणे ही काळाची गरज - विश्वजित कदम
सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी 20-25 क्विंटल असताना सुनील जगताप यांनी 2019 च्या खरिपात ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत सरीवर टोकण पद्धतीने एकरी फक्त 15 किलो बियाणे वापरून सोयाबीनचे एकरी 20 क्विंटल उत्पादन घेतल्याचे सांगितले.
सातारा - बेभरवशाचे हवामान, अवकाळी पाऊस, दुष्काळ, मजुरांची टंचाई, वाढता उत्पादन खर्च अशा समस्यांमधून शेतकरी जात आहे. शेतकऱ्यांनी काटेकोर व अचूक व्यवस्थापनाद्वारे उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पादन घेण्यासाठी ‘प्रीसिजन फार्मिंग’ची म्हणजेच काटेकोर पद्धतीने शेती करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले. जिल्ह्यातील वाई तालुक्यातील उडतारे या गावातील सुनील जगताप यांच्या ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत पेरणी यंत्राद्वारे टोकण पद्धतीने सोयाबीन पेरणी केलेल्या प्लॉटला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी 20-25 क्विंटल असताना सुनील जगताप यांनी 2019 च्या खरिपात ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत सरीवर टोकण पद्धतीने एकरी फक्त 15 किलो बियाणे वापरून सोयाबीनचे एकरी 20 क्विंटल उत्पादन घेतल्याचे सांगितले. जे की हेक्टरी 50 क्विंटल झाले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक विजय राऊत यांनी सांगितले की, सोयाबीन पिकासाठी सरीवर टोकण पद्धतीने लागवड करण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली आहे. हेक्टरी 50 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेण्याचे लक्ष्य साध्य करणार आहोत. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, तालुका कृषी अधिकारी व इतर अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.