महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी अडचणीत; जवळपास 45 कोटींचा फटका

आधी परतीच्या पावसाने आणि आता लॉकडाऊनमुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. बाजारपेठेत भाव मंदावल्याने शेतकऱ्यांना जवळपास ४५ कोटींचा फटका बसला आहे.

MAHABALESHWAR STRAWBERRY
लॉकडाऊनमुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी उत्पादक शेतक-याचं कंबरडं मोडलं आहे.

By

Published : Mar 31, 2020, 11:15 PM IST

सातारा -आधी परतीच्या पावसाने आणि आता लॉकडाऊनमुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. बाजारपेठेत भाव मंदावल्याने शेतकऱ्यांना जवळपास ४५ कोटींचा फटका बसला आहे. द्राक्ष आणि संत्र्याप्रमाणेच स्ट्रॉबेरी उत्पादक हवालदिल झाला असून हातचं पीक शेतात पडून असल्याने शासनाने या शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी होत आहे.

महाबळेश्वर तालुका थंड वातावरणाप्रमाणेच स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे. मार्च-एप्रिल महिन्यात स्ट्रॉबेरीचा सिझन असतो. महाबळेश्वरमध्ये या वर्षी २७०० ते २८०० एकर क्षेत्रात स्ट्रॉबेरीचे पीक आहे. त्यातून ३६ हजार मेट्रिक टन उत्पन्न मिळण्याचा शेतकऱ्यांना अंदाज होता. यातील ९० टक्के माल खुल्या बाजारात विक्रीसाठी, तर १० टक्के माल हा प्रक्रिया उद्योगात ज्यूस, आईस्क्रीम व इतर उपपदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येतो. मात्र, कोरोनाचे सावट आणि त्यानंतनर लॉकडाऊनमुळे महाबळेश्वरसह पाचगणीचे पर्यटन थांबले. तसेच देशभरातील फळबाजार मंदावल्याने स्ट्रॉबेरी उत्पादकांवर काळ आलाय.

उठाव नसल्याने फळाची तोड थांबली आहे. ८-१० दिवस फळ झाडाला तसेच लागून राहिल्यास पुढील उत्पादन थांबते, असे किसनशेठ भिलारे यांनी सांगितले. ते महाबळेश्वर तालुका सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी-विक्री संस्थेचे चेअरमन आहेत. चालू हंगामात किलोचा दर ६० रुपये गृहीत धरला, तरी महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे जवळपास ४५ कोटींचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. २०१९-२० या हंगामात परतीच्या पावसाने फळाचे सहा वेळा नुकसान झाले आहे. आता लॉकडाऊनमुळे एकूण उत्पादनापैकी निम्मे उत्पादन वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झालाय. वर्षातील संपूर्ण हंगामापैकी ५० टक्के उत्पादन मार्च आणि एप्रिल महिन्यात निघते. आता हा हुकमी हंगाम वाया गेल्याने उत्पादकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्ट्रॉबेरीवरील प्रक्रियादेखील थंडावली

वाई, कराड, पुणे या ठिकाणी स्ट्रॉबेरीचे प्रक्रिया उद्योग आहेत. यामध्ये बहुतांश उत्तर प्रदेशचे कामगार काम करतात. कोरोनामुळे ते आपापल्या प्रांतात परत गेल्याने सध्या प्रक्रिया उद्योग थंडावला आहे. महाबळेश्वरमधून जळगाव, बंगळूरू, मुंबई, पुणे, हैदराबाद या ठिकाणी फळाची वाहतूक होत होती. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक बंद पडल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजूशेठ बादापुरे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details