सातारा-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर आज काही युवकांनी दोन मोटारीतून येऊन दगडफेक केली. याचवेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थाना बाहेर शेण्या जाळण्याचा प्रकार घडला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अज्ञात युवकांनी हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
पोवई नाक्यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे 'दौलत' हे निवासस्थान आहे. या निवासस्थानाबाहेर अज्ञात युवकांनी शेण्या जाळण्याचा स्टंट केला. त्यानंतर या युवकांनी पोलिस कवायत मैदान रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस भवन या इमारतीवर दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनीही शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी भेट देऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.