महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काळ्या जादूसाठी वापरले जाणारे प्राण्यांच्या अवशेषांचा साठा जप्त, सातारा-कराडमध्ये मोठी कारवाई

काळ्या जादूसाठी वापरले जाणारे इंद्रजाल म्हणजेच काळे कोरल नावाच्या समुद्री प्राण्याचे मृत अवशेष, हत्ताजोडी या घोरपडीच्या शरीराचा भाग असलेले २७ अवशेष, 87 किलो चंदनाचे लाकूड व १,५२० मोरपिसे असे लाखो रुपये किंमतीचे साहित्य वनाधिकाऱ्यांनी जप्त केले.

काळ्या जादूसाठी वापरले जाणारे प्राण्यांच्या अवशेषांचा साठा जप्त, सातारा-कराडमध्ये मोठी कारवाई
काळ्या जादूसाठी वापरले जाणारे प्राण्यांच्या अवशेषांचा साठा जप्त, सातारा-कराडमध्ये मोठी कारवाई

By

Published : Oct 6, 2021, 12:59 PM IST

सातारा - तथाकथित काळ्या जादूसाठी वापरले जाणारे इंद्रजाल म्हणजेच काळे कोरल नावाच्या समुद्री प्राण्याचे मृत अवशेष, हत्ताजोडी या घोरपडीच्या शरीराचा भाग असलेले २७ अवशेष, 87 किलो चंदनाचे लाकूड व १,५२० मोरपिसे असे लाखो रुपये किंमतीचे साहित्य वनाधिकाऱ्यांनी जप्त केले.

पत्रकार परिषद

साताऱ्यातील ३ दुकानांवर कारवाई

याप्रकरणी साताऱ्यातील तीन व कराडमधील दोन अशा ५ संशयितांना ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनावले, भरारी पथकाचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण प्रमुख उपस्थित होते. महादेव मोहिते यांनी सांगितले की, सातारा वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काल वनविभागाने साताऱ्यात सदाशिव पेठेत दत्त पूजा भांडार व पंचमुखी पूजा साहित्य तसेच कोटेश्वर पूजा साहित्य, शाहू स्टेडीयम या तिन ठिकाणी धाडी घालून इंद्रजाल म्हणजेच काळे कोरल नावाच्या समुद्री प्राण्याचे मृत अवशेष व इतर प्रतिबंधित वन्यप्राण्याचे अवयव व आक्षेपार्ह वस्तू हस्तगत केल्या. दत्त पूजा भांडारमध्ये ५९ इंद्रजाल मिळून आले असून, चंदनाचे सुमारे ८० किलो तुकडे व सुमारे ६०० मोरपिसे मिळून आली. दुकान चालक संतोष लक्ष्मण घोणे याला अटक करण्यात आली आहे. पंचमुखी पूजा साहित्य या दुकानातून दत्तात्रय सदाशिव धुरपे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून साडेआठ किलो चंदनाचे तुकडे जप्त करण्यात आले. कोटेश्वर पूजा साहित्य, शाहू स्टेडीयम येथून राहुल विजय निकम यास ताब्यात घेतले असून, हत्ताजोडी या घोरपड या वन्य प्राण्याच्या शरीराचा भाग असलेले ९ अवशेष व मोरपिसे मिळून आले आहेत.

कराडमधुन दोघे ताब्यात

कराड येथे झालेल्या कारवाईत विजय बाबुराव धावडे & सन्स या दुकानात ११ इंद्रजाल मिळून आले. त्याचबरोबर हत्ताजोडी ७ नाग व साळशिंग या कोल्हा सदृश्य प्राण्याच्या कातड्यापासून बनविलेले ६ नग मिळून आले. प्रशांत जनरल & पूजा भांडार कराड या दुकानावरील धाडीत प्रवीण प्रकाश देशमुख यास ताब्यात घेतले असून, इंद्रजाल ८ नग, हत्ताजोडीचे ११ नग, साळशिंग या कोल्हा सदृश्य प्राण्याच्या कातड्यापासून बनविलेले १७ नग मिळून आले. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व जैव विविधता कायदा २००२ अन्वये बाळगणे, विक्री करण्यासाठी प्रतिबंधित असलेल्या इंद्रजाल नावाच्या समुद्री प्राण्याचे मृत अवशेष व इतर प्रतिबंधित वन्यप्राण्याच्या ‍अवयवापासून बनविलेल्या वस्तू विकताना आढळून आल्याने गुन्हा दाखल केला आहे.

आंतरराज्य टोळीचा सहभाग शक्य

अशा पद्धतीचे गुन्हे करणारी आंतरराज्य टोळी कार्यरत असण्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, भरारी पथकाचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण, वनक्षेत्रपाल तुषार नवले व त्यांच्या सहऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा -घरगुती गॅसच्या दरात 15 रुपयांनी वाढ; जाणून घ्या, नवे दर

ABOUT THE AUTHOR

...view details