कराड (सातारा) - पावसामुळे विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्यामुळे या मार्गावरील एसटी वाहतूक दुपारनंतर बंद करण्यात आली असून स्थानिक वाहतूकही पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच महामार्गानजीकच्या शेतांना तळ्याचे स्वरूप आले असून छोट्या-मोठ्या दुकानांतही पाणी शिरले आहे. दुकानांमध्ये शिरल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कराडनजीकच्या सैदापूर कॅनाल परिसरातील शेती पाण्याखाली गेली आहे. शेतांना तळ्याचे स्वरूप आले असून शेतातील पाणी रस्त्यावर आल्याने विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग पाण्यात गेला आहे. रस्त्यावर साडे तीन फुटांपेक्षा अधिक पाणी असल्याने सर्व आगारांनी कराड-सोलापूर मार्गावरील एसटी फेर्या रद्द केल्या आहेत. स्थानिक वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाने वळविली आहे. तसेच सैदापूर कॅनाल आणि ओगलेवाडी रेल्वे स्टेशन बाजूने रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलिसांनी बॅरिकेटस् लावून त्याठिकाणी पोलीस तैनात केले आहेत.