सातारा : लोणंद-नीरा मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावर झालेल्या एसटी आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील तीन तरूण जागीच ठार झाले आहेत. ओंकार संजय थोपटे, पोपट अर्जुन थोपटे आणि अनिल नामदेव थोपटे (सर्व रा. पिंपरे बुद्रुक-थोपटेवाडी, ता. पुरंदर), अशी मृतांची नावे आहेत. या अपघातामुळे लोणंद-नीरा मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या.
रेल्वे उड्डाण पुलावर अपघात :लोणंद-नीरा मार्गावर लोणंदपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे उड्डाण पुलावर गुरूवारी रात्री एसटी आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेली एसटी (क्र. एम. एच. 20 बी. एल. 4158 ) आणि नीरेकडून लोणंदकडे निघालेली मोटरसायकल (क्र. एम. एच. 12 आर. व्ही. 3158) यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारसायकलवरील तिन्ही तरूण जागीच ठार झाले.
अपघातानंतर वाहनांच्या रांगा :भीषण अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, उपनिरीक्षक गणेश माने आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.