सातारा :साताऱ्यातील कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणाला महाराष्ट्राची वरदायिनी आणि उद्योगविश्वाचा कणा मानले जाते. जलसंपदा विभागाने ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त धरणावर नेत्रदीपक तिरंगी रोषणाई केली आहे. यामुळे कोयना धरणाची भिंत तिरंग्यात उजळून निघाली आहे. सध्या कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सांडव्यातून पडणाऱ्या पाण्यावर प्रजासत्ताक दिनी तिरंगी प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. तिरंगी रोषणाईचा हा नेत्रदीपक नजारा डोळ्यांचे पारणे फेडत आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने धरणात समाधानकारक पाणीसाठा आहे.
स्वातंत्र्यदिनी सर्व धरणांवर होती रोषणाई :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्ट रोजी राज्यातील बहुतांश धरणांवर जलसंपदा विभागाने तिरंगी रोषणाई केली होती. त्यामुळे सर्व धरणे तिरंगी रोषणाईने उजळून निघाली होती. त्यानंतर आता प्रजासत्ताक दिनी कोयना धरण व्यवस्थापनाने प्रजासत्ताक दिनी तिरंगी प्रकाशझोत टाकून प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे. तर सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोयनानगर परिसर पर्यटकांनी फुलून गेला आहे. गुलाबी थंडी आणि धरणावरील दाट धुक्याची दुलई पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहे. उंचावरील रिसॉर्टमधून कोयना धरण परिसराचा नजारा पर्यटकांना पाहता येतो. त्यामुळे सध्या कोयनेतील हॉटेल आणि रिसॉर्टचे बुकींग फुल्ल आहे.