सातारा - रोजची ५ किलोमीटर पायपीट, मोबाइलच्या रेंजसाठी ४-४ दिवस पहावी लागते वाट, लागलं खुपलं तर बेभरोशाची सर्व्हीस लाँच हाच आधार, जंगली श्वापदांशी चालणारी लपाछपी, अशा वेळी हातातील लाठी हेच एकमेव स्वसंरक्षणाच शस्त्र...तरिही पावणेदोन वर्षांच्या लेकराला सासरी ठेऊन ती निर्मनुष्य जंगल राखतीये. पाहा 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट...
अश्विनी पवार या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात (कोअर झोन) वनरक्षक म्हणून म्हाळुंगे बीटचा कार्यभार आहे. दुर्गम क्षेत्रात एकटी महिला अनोळखी लोकांबरोबर काम कसं करते हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'ईटीव्ही भारत'ने केलाय. अश्विनी पवार यांना भेटण्यासाठी जावणी तालुक्यातील बामणोलीतून लाँच निघाली. सुमारे दोन तासांचा लाँच प्रवास केल्यानंतर त्रिवेणी संगम ओलांडून आम्ही म्हाळुंगेला पोहचलो. दुर्गम कांदाटी खोऱ्यात वन्यजीव विभागाचे हे महत्वाचं ठाणं. सुमारे २ हजार ८०० हेक्टर क्षेत्राचा ७० टक्के भाग निर्मनुष्य आहे. दोन वनमजूरांच्या मदतीने अश्विनी हे बीट गेली तीन वर्षे सक्षमपणे सांभाळतात.
दुष्काळी माण तालुक्यात, शिंदी खुर्द, दहिवडी येथील अश्विनी २०१७ मध्ये वन्यजीव विभागात बामणोली परिक्षेत्रात त्यांची बदली झाली. मुसळधार पाऊस, जीव घेणे वादळी वारे, अवतीभोवती डोंगर-टेकड्या, झाडं आणि वन्यजीव! त्यातून वाट काढत वनसंपदा राखायचं आव्हान दुष्काळी भागातून आलेल्या पवार यांनी पेललंय. पती सीआयएसएफमध्ये नोकरी करतात. त्यामुळे मुलाला सासू-सासऱ्यांच्या हवाली करून त्या कांदाटी खो-यात कर्तव्य बजावत आहेत. १५-२० दिवसांतून सलग सुट्टी घेऊन त्या मुलाला भेटायला जातात. लाॅकडाऊनच्या तीन महिन्यांच्या काळात रहदारी बंद असल्याने त्यांना मुलाला भेटता नाही आले.