सातारा- 'बिबट्या'च्या दहशतीमुळे ओळख असणारे साताऱ्याजवळील महादरे हे गाव फुलपाखरांचे गाव म्हणून नवी ओळख बनवू पाहत आहे. पश्चिम घाटातील 360पैकी सुमारे 200 फुलपाखरांच्या प्रजाती महादरेत आढळतात. त्यामुळे ड्रोंगो या संस्थेच्या सहकार्याने 'फुलपाखरांचे गाव'साठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे यांनी याबाबतची माहिती दिली. ते 'ईटीव्ही भारत'शी बोलत होते. सातारा शहराच्या हद्दीवर महादरे हे छोटसे गाव आहे. निसर्ग संपन्नतेमुळे मोर, गवे, भेकर, रानडुकरांसह बिबट्यांचा अधिवास याठिकाणी आहे.
'मलबार बँडेड पिकॉक' हे वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरू येथे आढळत असल्याचे भोईटे यांनी सांगितले. मोराच्या पिसाऱ्यातील डोळ्यात असणारे रंग या फुलपाखराच्या पंखांवर पहायला मिळतात. अत्यंत देखणं हे फुलपाखरू महादरेत दिसते. शेड्युल 1मध्ये वाघाबरोबर संरक्षित गणले गेलेले 'आर्कीड टीट' हे फुलपाखरू महादरेत आढळते. भारतातील आकाराने सर्वांत लहान फुलपाखरू 'ग्रास ज्वेल', महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू 'ब्लू मॉरमॉन' तसेच फुलपाखरांच्या एक्स्ट्रा लास्कर यासारख्या काही केरळमध्ये आढळणाऱ्या प्रजाती थेट महादरेत आढळतात. 'पंचमढी बुशब्राऊन' हे मध्य प्रदेशातील पंचमढी या पर्यटनस्थळी आढळणारे फुलपाखरू महादरेत दिसते. महादरेत फुलपाखरांसाठी असणारा आदर्श अधिवास संवर्धित करण्यासाठी उपायोजना केल्या जातील.
वृक्षारोपण करताना फुलपाखरांच्या जैवश्रृंखलेशी निगडीत असणाऱ्या झाडांचा विचार केला जाईल. महादरेत असणाऱ्या फुलपाखरांची ओळख अभ्यासक व नागरिकांना होण्यासाठी एक माहिती केंद्र उभारले जाईल. महादरेची जैवविविधता टिकून राहण्यास स्थानिक लोकांसाठी प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातील. या माध्यमातून फुलपाखरांचं नैसर्गिक उद्यान साकारण्याचा प्रयत्न असल्याचे सुनील भोईटे यांनी स्पष्ट केले.
फुलपाखरांच्या अभ्यासक प्रा. डॉ. प्रतिमा पवार म्हणाल्या, "महादरे ग्रामस्थांनी पिढ्या - दरपिढ्यांचा निसर्गवारसा प्रयत्नपूर्वक सांभाळला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना कायद्याचे संरक्षण देण्यासाठीच या प्रदेशाचा समावेश कंझर्वेशन रिझर्व्ह किंवा कम्युनिटी रिझर्व्हमध्ये करण्यात यावा. जेणेकरून लोकसहभागातून वनसंवर्धन, संरक्षण यासह विविध शासकीय योजना व पर्यटनामधून महादरे परिसर व गावाचा सर्वांगीण विकास साधता येईल.
महादरेतील जैवविविधता