सातारा- शहरात शिरताच अजिंक्यतारा किल्ला लक्ष वेधू लागतो. या किल्ल्याच्या किल्ल्याच्या सौंदर्यात दक्षिण दरवाजाने निश्चितच भर घातली आहे. मात्र, हा दरवाजाच आता वन्यजीवांसाठी अडसर ठरु लागला आहे. त्यामुळे तहानलेले वन्यजीव तहाण भागवण्यासाठी मानवी वस्तीत शिरण्याची भिती आहे. शाहूनगरमध्ये डोकावून जाणारा बिबट्या धोक्याची घंटा वाजवत आहे.
सुनिल भोईटे, वन्यजीव रक्षक अजिंक्यतारा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व तर आहेच. परंतु, इतिहास काळापासून हा किल्ला वाघ, बिबट्यासह अन्य वन्यजीव तसेच पशू-पक्षांचे आश्रयस्थानही आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने किल्ला परिसरातील जलस्त्रोतांकडे वन्यजीव येतात. किल्ल्यावरील मंगळाईचे तळे व लगतची 2 तळी हा एकमेव जलस्त्रोत वन्यजीवांसाठी पावसाळ्यापर्यंत आधार असतो. तर किल्ल्याचा दक्षिण दरवाजा हा वन्यजीवांसाठी राजमार्ग आहे. मात्र, काही पर्यटक हा दरवाजा बंद ठेवत असल्यामुळे हा दक्षिण दरवाजा वन्यजीवांसाठी अडसर ठरत आहे.
शेकडो हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या या किल्ल्यावर वन्यजीवांसाठी किल्ल्यावरील तळी हाच एकमेव पाण्याचा स्त्रोत उन्हाळ्यात उपलब्ध असतो. त्याकडे जाणारा मार्ग बंद झाल्याने वन्यजीव किल्ल्याच्या पायथ्यसवरील मानवी वस्तीत घुसतील, अशी भीती प्राणीवर्तन शास्त्राच्या अभ्यासकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली आहे.
गेल्या आठवडाभरापासून बिबट्या शाहूनगरमधील बंगल्यांच्या कंपाऊंडवरुन डोकावून जात आहे. 'लॉकडाऊन'मुळे रस्ते ओस पडले आहेत. दिवसभर तहानलेले जीव अंधार पडल्या-पडल्या पाण्याच्या शोधात शाहूनगरमध्ये फिरायला लागले आहेत.
वन्यजीवांचा वाढता वावर याची चर्चा समाजमाध्यमातून सातारा शहरात पसरली आहे. काही अतिउत्साही मंडळी प्राण्यांचे दर्शन घडेल या कुतुहलातून, स्वत:चा जीव धोक्यात घालून किल्ला परिसरातील आडवाटा धुंडाळू लागली आहेत. रात्रीच्या अंधारात हातात तीव्र प्रकाशाचे झोत घेऊन काही लोक 4-8 जणांच्या गटाने पायवाटांतून हिंडत आहेत. त्यामुळे किल्ल्यावर फिरायला जाणाऱ्यांना शासनाने पायबंद घालावा, अशी मागणी निसर्गप्रेमींतून व्यक्त होत आहे. तसेच किल्ल्याचा दक्षिण दरवाजा उघडा राहिल, याची दक्षता प्रत्येक नागरिजाने घ्यावी, अशी अपेक्षा अमोल कोडक यांनी व्यक्त केली आहे.