सातारा - मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरुन जात पंचायतीने जावळी तालुक्यातील मेढा येथील संपुर्ण कुटुंबाला बहिष्कृत केले होते. याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसांच्या मदतीने यशस्वी मध्यस्थी केली. यामुळे पंचायतीने निर्णय मागे घेत वेगळा आदर्श घालून दिला.
तीन जिल्ह्यातील बसली जात पंचायत -
मेढा येथील रहिवासी कुटुंबातील मुलीचा आंतरजातीय विवाह तिच्या पसंतीने, तसेच संबंधित समाजातील लोकांना कल्पना देऊन झाला. विवाहाला सर्वांना निमंत्रितही करण्यात आले. तरीही मुलीच्याच समाजातील जात पंचायतीने मुलीच्या कुटुंबीयांना बहिष्कृत केले होते. समाजातील अनेक कार्यक्रमांना बोलावले जात नव्हते. या बहिष्कार प्रकरणात पोलादपूर (जि.रायगड), नागेवाडी (ता.सातारा), मेढा (जि.सातारा) व रत्नागिरी असे तीन जिल्ह्यातील जात पंचायतीमधील लोक सहभागी झाले होते.
पोलिस अधीक्षकांकडून दखल -
याबाबत सातारा जिल्हा 'अंनिस'कडे लेखी तक्रार आली होती. समितीने साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेतली यावेळी त्यांना सामाजिक बहिष्कार कायदा अस्तित्त्वात असूनही अशा घटना घडत आहेत, याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर पोलीस अधीक्षकांनी घटनेची दखल घेत संबंधित पंच व तक्रारदार यांना बोलवून चर्चा करावी आणि सामंजस्याने प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा रीतसर सामाजिक बहिष्कार कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश दिले. या अनुषंगाने मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अमोल माने व सातारा जिल्हा अंनिस आणि संबंधित सर्व पंच तसेच तक्रारदार यांच्यात सामंजस्य बैठक झाली.