सातारा : कोयना-कृष्णा नदीच्या प्रीतिसंगमावर गणेशमुर्तींच्या विसर्जनाला दरवर्षी गर्दी होत असते. मात्र, यंदा कोरोनामुळे प्रशासनाने नदीपात्रात मूर्ती विसर्जनास मनाई केली होती. तसेच नदीपात्राकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. यावेळी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. त्यामुळे प्रीतिसंगम परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला.
कराडच्या प्रीतिसंगमावर यंदा गणेश विसर्जनाला मनाई; गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने नदीपात्रात विसर्जनास मनाई केली. नागरिकांनी शक्यतो घरातच बादलीमध्ये विसर्जन करावे अथवा मूर्ती संकलनासाठी येणाऱ्या नगरपालिका कर्मचाऱ्यांकडे देण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते.
प्रशासन या मूर्तींचे विधीवत विसर्जन करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. काल दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. त्यावेळी सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता. विविध ठिकाणी बॅरिगेट्स लाऊन रस्ते बंद करण्यात आले होते. तसेच तळ्यातील विसर्जनाला संपूर्ण बंदी घालण्यात आली.
त्यानुसार रविवारी दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी कराडकरांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले आहे. गणरायाच्या आगमनावेळी नागरीकांनी नियमांचे पालन केले. त्याप्रमाणे विसर्जनावेळी प्रशासनाला सहकार्य करून कोरोनाचे संक्रमण टाळावे, असेही ते म्हणाले. कराड नगरपालिकेने मूर्ती संकलनासाठी पुरेशा वाहनांची सोय केली आहे. या वाहनांमध्ये मूर्ती संकलन करून सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस, नगरपालिका आणि महसूल प्रशासनाने केले आहे.