सातारा -कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कराड शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून 'सोशल डिस्टन्सिंग'चा प्रयोग राबविण्यास सुरुवात केल्याची माहिती कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली. कराडकर नागरिकांना अन्नधान्य, भाजीपाल्याची टंचाई भासणार नाही. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहनही डांगे यांनी केले.
कराडमध्ये भाजीपाला विक्रीसह किराणा दुकानांसमोर 'सोशल डिस्टन्सिंग' कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भाजी मंडई आहे. त्यामुळे गर्दी टाळणे महत्त्वाचे होते. यासाठी शहरात विकेंद्रित पद्धतीने भाजीपाला विक्रीची केंद्र सुरू करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. यातील पहिले केंद्र कृष्णा नाक्यावर सुरू केले आहे. याबरोबरच शहराच्या अन्य भागातही भाजीपाला विक्री केंद्र सुरू होणार आहे. फळे, कांदे-बटाटे हेही रहिवाशांना त्यांच्या भागात मिळण्याची सोय नगरपालिका करणार आहे. यासाठी फिरत्या विक्रीची मदत घेतली जाणार आहे.
भाजीपाला खरेदी करताना दोन व्यापाऱ्यांमध्ये तसेच दोन ग्राहकांमध्ये किमान एक मीटरचे अंतर ठेवण्याचा निकष नगरपालिकेने लागू केला आहे. त्यानुसार मंडई व अन्य ठिकाणी भाजीपाला विक्री केंद्रासमोर रेषांची आखणी केली आहे. किराणा मालाची टंचाई भासू नये, यासाठी शहरातील व्यापाऱ्यांना व्हॉट्सअॅपद्वारे होम डिलिव्हरी देण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्याला किराणा व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. किराणा दुकानासमोरही खरेदीवेळी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी प्रत्येक दुकानासमोर एक मीटर अंतरावर रेषांची आखणी केली आहे. त्या रेषांमध्ये उभे राहून तसेच प्रत्येक वेळी दुकानात एका ग्राहकाला प्रवेश या धर्तीवर खरेदी सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी डांगे यांनी सांगितले.
कराडमध्ये नगरपालिकेतर्फे निर्जंतुकीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. 'होम टू होम' तपासणी सुरू असून आवश्यक तिथे लोकांना क्वारंनटाईन केले असल्याचेही मुख्याधिकारी डांगे म्हणाले.