सातारा- जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या एकूण 67 नागरिकांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये सर्वाधिक 29 बाधित सातारा तालुक्यातील रहिवासी आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
गेल्या तीन महिन्यात कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या ही कराड तालुक्याची डोकेदुखी होती. आता सातारा तालुक्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या आठवडाभरापासून सातारा शहरासह तालुक्यात मोठ्या संख्येने बाधित आढळून येत आहेत.सातारा तालुक्यातील जिहे येथे बाधितांची संख्या वाढत आहे.
67 रुग्णांमध्ये सातारा, कराड, खटाव, खंडाळा, कोरेगाव, वाई व पाटण तालुक्यातील व्यक्तींचा समावेश आहे. या 67 जणांमध्ये निकट सहवासित 59, प्रवास करुन आलेले 4, सारीचे 4 रुग्ण आहेत. जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 27 नागरिकांना दहा दिवसांनतर कोरोनामुक्त झाल्यावर घरी सोडण्यात आले असल्याचे डाॅ. गडीकर यांनी स्पष्ट केले.