कराड (सातारा) -कराडमधील वाखान परिसरात शनिवारी (दि. 25) सकाळी उज्ज्वला ठाणेकर (वय 32) या महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलीस तपासात उज्जवला यांच्या सख्ख्या बहिणीने प्रियकाराच्या मदतीने हे कृत्य केल्याचे कबूल केले आहे.
हेही वाचा -सक्षम कारखाने अवमूल्यन करुन घशात घालणे ही पवार परिवाराची मोडस - किरीट सोमैया
सातारा स्थानिक गुन्हे शाखेने चोवीस तासात उज्ज्वला यांची सख्खी बहीण ज्योती सचिन निगडे आणि तिचा प्रियकर सागर अरूण पवार यांना अटक केली. पती सचिन याच्याशी उज्ज्वला यांचे अनैतिक संबंध असल्याच्या रागातून ज्योतीने प्रियकर सागरच्या मदतीने उज्जवला यांची गळा चिरून हत्या केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 4 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
उज्ज्वला रघुनाथ ठाणेकर (मूळ रा. पेठ वडगाव, जि. कोल्हापूर) या कराडमधील वाखान परिसरात भाड्याच्या घरात एकट्याच राहत होत्या. शनिवारी सकाळी घरात त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. अज्ञाताने गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे गतिमान करत उज्ज्वला यांची सख्खी धाकटी बहीण ज्योती आणि तिचा प्रियकर सागर पवार या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान पती सचिन याचे उज्जवला यांच्याशी अनैतिक संबंध असल्याच्या रागातून आपण बहिणीची हत्या केल्याची कबुली ज्योतीने दिली. ज्योती आणि सागर हे दोघे शुक्रवारी (दि. 24) रात्री नदीकाठच्या शेतातून उज्ज्वलाच्या घरी आले. नवर्याशी संबंध का ठेवलेस, अशी विचारणा करत ज्योतीने उज्ज्वला यांना मारहाण केली. तसेच, सागर व ज्योतीने तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यामध्ये उज्ज्वला यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या करून दोघेही शेतातून पसार झाले.
हेही वाचा -पवार, ठाकरेंनी बंदी घालून दाखवावी; किरीट सोमय्यांचे चॅलेंज